श्री स्वामी समर्थ, अक्कलकोट

श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांचा अवतार हा श्री दत्त परंपरेत चौथा मानला जातो. दत्तसंप्रदायात ही परंपरा पुढीलप्रमाणे आहे. वेद आणि पुराणकाळात श्रीदत्त ही विभूती होऊन गेली. अत्रिऋषी आणि अनसूया यांचा पुत्र म्हणजे श्रीदत्तगुरू हे होत. ऐतिहासिक दृष्टीने पाहता दत्तपरंपरेतील पहिले सत्पुरुष म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ होत. पूर्वेकडील प्रांतात पीठापूर येथे १४व्या शतकात त्यांचा जन्म झाला. त्यांनी आपला अवतार संपविताना ‘पुन्हा-भेटेन’ असे अभिवचन भक्तांना दिले आणि त्याप्रमाणे तेच पुढे नृसिंहसरस्वती या नावाने कारंजानगर येथे (कारंजा-वऱ्हाड) जन्मास आले. त्यांच्या अवतारकार्याचा कालावधी इ.सन १३७८ ते १४५८ हा आहे. त्यांनी गाणगापूर येथे श्रीपाद श्रीवल्लभांच्या पादुकांची स्थापना केली. इ. सन १४५७च्या सुमारास ते श्रीशैल यात्रेच्यावेळी कर्दळीवनातून गुप्त झाले आणि त्यानंतर सुमारे ३०० वर्षांनी कर्दळीवनातून ते पुन्हा प्रकट झाले. तेच स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज होत. ऐतिहासिकदृष्ट्या ते तिसरे सत्पुरुष असून दत्ताच्या विभूतिमत्वाचा ते ‘चौथा अवतार’ मानले जातात. श्री दत्तसंप्रदायात जनार्दन स्वामी, एकनाथ, दासोपंत, माणिकप्रभू, नारायण-महाराज जालवणकर, चिदंबर दीक्षित, वासुदेवानंद सरस्वती ऊर्फ टेंबे स्वामी असे अनेक थोर सत्पुरुष होऊन गेले. श्री स्वामी समर्थांनी स्वत:च ‘मूळ पुरुष वडाचे झाड, दत्तनगर हे वसतिस्थान आणि नाव ‘नृसिंहभान’ असे भक्तांना सांगितल्याने दत्तसंप्रदायात श्री स्वामी महाराजांचे स्वरूप हे श्रीदत्ताचे ‘चौथे अवतारित्व’ मानण्यात आले. त्यामुळे दत्तभक्त हे स्वामीभक्त झाले.