श्रीदत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ मानले जातात. आपल्या अवतार समाप्तीच्या वेळी श्रीनृसिंहसरस्वती श्रीशैल्य येथून कर्दळीवनामध्ये गेले. तेथे ते तपश्चर्येला बसले. मध्ये साडेतीनशे वर्षे गेली. त्यांच्याभोवती वारूळ तयार झाले. एकेदिवशी एक लाकूडतोडय़ा लाकूड तोडताना त्याचा घाव चुकला आणि तो वारुळावर पडला. त्या वारुळातून श्रीस्वामी समर्थ प्रकट झाले, असे सांगितले जाते. लाकडे तोडताना कुऱ्हाडीचा घाव वारुळावर बसला व तो श्रीस्वामी समर्थांचे मांडीवर लागून श्रीस्वामी समर्थ समाधीतून जागे झाले. तो कुऱ्हाडीचा वार त्यांचे मांडीवर स्पष्ट दिसत असे. श्रीस्वामी समर्थ तेथून श्रीकाशीक्षेत्री प्रकट झाले. तेथून गंगाकाठाने कलकत्ता, जगन्नाथपुरी मार्गाने गोदावरी तीरावर आले. प्रथम श्रीस्वामी समर्थ मंगळवेढे ग्रामी प्रकट झाले. ते रानात वास्तव्य करीत. क्वचित गावात येत. गावात एक ब्राह्मण कुटुंब होते. ते श्रीस्वामी महाराज गावात आले की भोजन देत. मंगळवेढे येथील वास्तव्यानंतर श्रीस्वामी समर्थ पंढरपूर, मोहोळ, सोलापूर ह्या ठिकाणी वास्तव्य करून ‘श्री’ अक्कलकोट येथे आले त्या वेळी तीन दिवस स्वामींनी अन्नग्रहण केले नव्हते. चोळाप्पा यांनी स्वामींना आपल्या घरी नेले व त्यांना भोजन दिले. त्या वेळेपासून श्री चोळाप्पा स्वामींचे एकनिष्ठ शिष्य झाले. चोळाप्पांचे घरातील मंडळी त्यांना ‘एक वेडा घरात आणून ठेवला आहे’ असे म्हणत. श्री स्वामींच्या दिव्यत्वाची प्रचिती अक्कलकोट येथील मंडळीस येऊ लागली व लोक स्वामीदर्शनास येऊ लागले. राजेसाहेब भोसले यांचीही श्रीस्वामींवर दृढ भक्ती झाली. श्रीस्वामी समर्थ राजवाडयात कधी कधी जात व एखादे वेळी त्यांचा राजवाड्यातच चारचार दिवस मुक्काम असे.
श्रीदत्तात्रयांचे तिसरे अवतार